उदात्तीकरण ही संकल्पना आपल्याला नवीन नाही. एखाद्या गंभीर गुन्ह्याचे आपल्या इथे सहज उदात्तीकरण केले जाते. काही वर्षांपूर्वी मोठ्या पडद्यावर एक सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्या सिनेमात नायक व्यवस्थेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या हत्या करतो. हत्या केल्यानंतर त्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे उघड करतो. चित्रपटाच्या शेवटी त्या नायकाला फाशीची शिक्षा होते. ती शिक्षा होऊ नये म्हणून मोठा जनसमुदाय जमा होतो. तरी नायक स्वमर्जीने फासावर लटकतो, असे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. एव्हाना तुमच्या लक्षात आले असेल मी कोणत्या चित्रपटाबद्दल बोलतोय. तर हा चित्रपट पाहून बाहेर आलेल्या प्रेक्षकांच्या मनात देखील अशाच भावना दाटून येतात. 'नायकाने व्यवस्थेलाच जागं करण्यासाठी हे पाऊल उचललं, अन्यायाला कोणीतरी वाचा फोडलीच पाहिजे, भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्याचं हे योग्य माध्यम आहे, वगैरे वगैरे...', अशी अनेक मते प्रेक्षक चित्रपटगृहाच्या बाहेर आल्यावर व्यक्त करतात. कायद्याचे उल्लंघन करीत न्याय करणाऱ्या (लोकांच्या नजरेत) त्यासाठी भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या हत्या करण्याव्यतिरिक्त त्या नायकाचे समाज आणि देशासाठी योगदान काय? असा प्रश्न स्वतःला एकदा विचारून पहा. ते एक बरं झालं, आपली न्यायदेवता आंधळी असली तरी भावनाप्रधान नाही. अन्यथा समाजातील निम्मे गुन्हेगार आपण केलेल्या गुन्ह्याचे समर्थन मिळवून आरोपातून निर्दोष मुक्त झाले असते. 

        गोडसे प्रकरण मागील काही दिवसापासून पुन्हा चर्चेत आलंय. त्यामागील कारण हेच 'उदात्तीकरण' आहे. आपलं कार्य हीच आपली ओळख असते. स्वतःला देशभक्त समजणारी ही व्यक्ती आज फक्त गांधी हत्येसाठी ओळखली जाते. याउलट गांधींचा यांचा कितीही द्वेष केला तरी त्यांची देशभक्ती नव्याने मांडावी लागत नाही. एकदा स्वतःला प्रश्न विचारून पहा 'गोडसे या व्यक्तीचे देशासाठी आणि समाजासाठी योगदान काय?' गोडसेचे योगदान, देशाला आणि जगाला देखील एक स्वतंत्र विचारसरणी देणाऱ्या महात्म्याएवढं नक्कीच नाही. मग तरीही गोडसे समर्थन केलं जातं? मला असं वाटतं, की ते गोडसे समर्थ नसतेच मुळी. तो असतो गांधी द्वेष!

        प्रश्न राहतो तो भूमिका बजावणाऱ्या अभिनेत्याचा. आजवर चित्रपटाच्या माध्यमातून अनेक हत्या करणाऱ्या गुंडांचे देखील उदात्तीकरण करण्याचे प्रयत्न झालेच आहेत. गुन्हा करण्यामागे गुन्हेगाराकडे कारण असतं. पण म्हणून त्या गुन्हाचे समर्थ होऊ शकते का? नक्कीच नाही. ज्याप्रमाणे गुन्हेगाराला आपला वकील मिळवण्याची मुभा असते आणि गुन्हेगाराच्या वकिलाला नैतिक आणि अनैतिक बंधने पाळावी लागत नाहीत, त्याप्रमाणे अभिनेत्याचं असतं. आपल्या भूमिकेला न्याय मिळवून देणे हे अभिनेत्याचं कौशल्य. त्यामुळे तो अभिनेता त्या भूमिकेचं समर्थन करत असेलच असे नाही. इथे महत्वाचा मुद्दा आहे, तो समाज म्हणून आपला, काही प्रश्न स्वतःला विचारण्याचा. आपण कसा विचार करतो यावर आपलं आणि पर्यायाने समाजाचं भवितव्य अवलंबून असतं. ज्यांना हा विचार झेपत नाही, ते एकतर गोडसेचे समर्थन करता वा अभिनेत्यावर आरोप.