​अलीकडे शिक्षण व्यवस्था एक बाजार झाली आहे. या बाजारात प्रत्येकाचे दर वेगवेगळे आहेत. शेवटचं प्रॉडक्ट सर्वांचं सारखंच असलं, तरी मशागतीसाठी घेतली जाणारी किंमत निराळी आहे. गोंधळून जाऊ नका, हा ब्लॉग कोड्यात नसेल. जे असेल ते अगदी थेट असेल. शीर्षकाचं स्पष्टीकरण ब्लॉगच्या अगदी शेवटी एका प्रश्नाने दिलंय; ज्याला वाचायला जड जातंय त्याने थेट शेवट वाचावा!


​'खाजगी शिक्षण संस्था आणि कोचिंग क्लासेस'... सर्वसाधारणपणे यांना 'शिक्षण माफिया' बोललं जातं. पण ही झाली नाण्याची केवळ एक बाजू. दुसरी बाजू जाणून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. आधी पुढे दिलेली आकडेवारी जरा नजरेखालून घाला:

​"भारतात अद्याप १० लाखांपेक्षा जास्त शिक्षकांची पदे रिक्त आहेत." — हे मी नाही, तर 'नीती आयोग' आणि 'युनेस्को'चा अहवाल सांगतोय. एकूण रिक्त पदांपैकी ६०% पेक्षा जास्त पदे ग्रामीण भागातील शाळांमध्ये आहेत. एकट्या उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये प्रत्येकी १ लाखांहून अधिक शिक्षकांच्या जागा भरलेल्या नाहीत. देशात आजही १ लाख ४ हजारपेक्षा जास्त शाळा अशा आहेत, ज्या फक्त एकाच शिक्षकाच्या भरवशावर चालतात. या शाळांमध्ये अंदाजे ३३ लाखांहून अधिक विद्यार्थी भविष्य शोधताहेत.

​त्यात सरकारी शाळांचा दर्जा इतका सुमार आहे की, त्या तुलनेत पालकांचा खाजगी शाळांकडे ओढा वाढणारच. त्यात गैर काय? एसटी महामंडळाच्या बसपेक्षा जर खाजगी बस मला अधिक चांगली सुविधा आणि वेळेची खात्री देणार असेल, तर कोणत्या बसने प्रवास करायचा हा माझा निर्णय आहे. मग खाजगी बसचालक जास्त पैसे आकारतात म्हणून ते 'ट्रॅव्हल्स माफिया' ठरणार का?

​मुळात शिक्षण हा माफियांचा अड्डा झालाय असं ढोबळमानाने बोलणंच चुकीचं ठरेल. शिक्षण म्हणजे 'समाजसेवा' असं बोलण्याचा नैतिक अधिकार फक्त सरकारला आहे; कारण तिथे काम करणाऱ्या शिक्षकांना सरकारी पगार मिळतो आणि त्यांच्या भविष्याची आर्थिक तरतूद केली जाते. पण जेव्हा शिक्षणाचा संबंध खाजगी क्षेत्राशी येतो, तेव्हा आपसूकच 'प्रॉफिट' (नफा) आणि 'गुंतवणूक' हे मुद्दे उपस्थित राहणारच.
​सध्या सर्वत्र सुरू असलेला शिक्षणाचा घोडेबाजार योग्य आहे, असं अजिबात नाही. पण या शिक्षण व्यवस्थेत जी मंडळी प्रामाणिकपणे आपली संस्था किंवा क्लास चालवताहेत, त्यांचा विचार आपण भावना बाजूला ठेवून केला पाहिजे. जे काम सरकारी यंत्रणेने करणं अपेक्षितही होतं ते त्यांनी केलं नाही, मग याचं खापर आपण खाजगी शिक्षण संस्थांवर का फोडणार? ​आज मुंबईसारख्या शहरात पालकांना लाखोंचे डोनेशन द्यावे लागते, त्याला जबाबदार फक्त खाजगी संस्था आहेत का? आपण आपल्या मुलांना सरकारी शाळेत का टाकत नाही? ज्या सुविधा खाजगी शाळा देतात, त्या सरकारी शाळा का देऊ शकत नाहीत? चहा टपरीवर प्यायलात काय आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन प्यायलात काय, 'चहा' ही चहाच असते. फक्त किंमत बदलते आणि त्या किमतीच्या बदलामागे अनेक पैलू असतात. मुळात आपल्याला चहा कुठे प्यायची आहे, हे आपण ठरवतो.

​आज देशात लाखो तरुण डी.एड, बी.एड करून बेरोजगार फिरताहेत, पण सरकार भरती करत नाही. दुसरीकडे खाजगी शाळांमध्ये शिक्षकांना अत्यंत तुटपुंजा पगार देऊन राबवून घेतले जाते. परिणामी, गुणवंत लोक या क्षेत्राकडे पाठ फिरवत आहेत. देशाचं भविष्य घडवणारा 'शिक्षक'च जर आर्थिक विवंचनेत असेल, तर याला जबाबदार कोण? हे कोणामुळे घडतंय? खाजगी शिक्षण माफियांमुळे की सरकारच्या नाकर्तेपणामुळे?
​खाजगी शिक्षण संस्था आणि कोचिंग क्लासेसना सर्रास 'शिक्षण माफिया' ठरवून सरकारी व्यवस्था स्वतःची जबाबदारी झटकू शकत नाही. इथे कुठेही शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्यांचे समर्थन केलेले नाही. पण जे शिक्षक आणि संस्था आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत आहेत, त्यांना या बाजारात एकाच रांगेत उभं करणं योग्य नाही. ज्यांना आज 'शिक्षण माफिया' बोललं गेलंय त्यांनी उद्यापासून शिक्षण क्षेत्रात योगदान देणं बंद केलं तर भारतीय शिक्षण व्यवस्थेचं काय होईल याचा विचार करून पहा! 

​आता शेवटचा प्रश्न: जर खाजगी संस्था चालवणारे 'माफिया' असतील, तर जनतेच्या करातून पगार घेऊनही देशातील शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ करणारे आणि लाखो जागा रिक्त ठेवणारे कोण?