माफीनामा!
'कार्तिक आम्हाला कॉल करत नाही, कार्तिक आमचे कॉल घेत नाही', 'कार्तिक समोरून मॅसेज करत नाही, कार्तिक आमच्या मॅसेजना रिप्लाय देत नाही', 'कार्तिक लय बिझी झालाय, कार्तिक नक्की करतोय काय?'... असे एक न अनेक प्रश्न तुमचे असतील. ज्यांच्याशी आपण रोज बोलत नसलो, तरी घनिष्ट संबंध राखतो त्यांच्याकडून वरील प्रतिक्रिया येणे स्वाभाविक आहे. आणि खरं सांगायचं, तर घडलं देखील तसंच आहे. भेट सोडा मागील वर्षभरात मी तासभर वेळ देखील दिला नाहीये अनेकांना... तुमच्या वरील आरोपांचे खंडन करणार नाहीये. थोडंसं माझं मत मांडतोय. बघा समजलं तर समजून घ्या!
काल वयाची २४ वर्षे पूर्ण केलीत. वयाच्या या टप्प्यावर आयुष्यातील एखादं स्वप्न गाठायचा निश्चय होता. ही पातळी म्हणजे अनेकांच्या ठायी 'वेडपटपणा', तर काहींच्या ठायी 'अतिरंजित स्वप्न'. जोवर तुम्ही यशस्वी नसता तोवर तुम्ही जगाच्या दृष्टीने 'अयशस्वी'च... आपल्याकडे यश न मिळणे हेही एक अपयश असतं हे कळून चुकलंय मला. त्यास चूक म्हणता येणार नाही. कारण एखादी गोष्ट चूक किंवा बरोबर ठरवण्याचा अधिकार देखील अयशस्वी मंडळींना नसतो, असं मला वाटतं!
२०१६, तब्बल १२ वर्षांनंतर मुंबईत पुनरागमन. मुंबई माहीत नसताना सोडली होती. कळत्या वयात पुन्हा या मायनगरीत पाय ठेवला. तीन वर्षे लागली मुंबई समजून घ्यायला. २०१९ पदवी शिक्षण पूर्ण केले आणि बाजारात आपल्या स्वप्नांच्या बांधणीसाठी साहित्य जोडणीला लागलो. वर्षभर नोकरी, त्यानंतर दोन व्यवसाय केले. अनुभव माफ करा 'अपयशाचा अनुभव' मिळवत पुढच्या वाटेला लागलो. स्वप्नांची गगनचुंबी इमारत उभी करायची होती. त्यासाठी पायाभरणी सुरू केली आणि होतं नव्हतं ते सारं त्यात ओतलं. ही गुंतवणूक इतकी होती, की आता इमारत उभारणीसाठी गुंतवणूक आणायची कुठून हा प्रश्न निर्माण झाला. आयुष्यात किती दिवे लावले माहीत नाही, पण एक बाब नक्की केलीये; 'उघड्या मैदानावर निधड्या छातीने समोरून येणाऱ्या संकटांना तोंड देत आलोय.' ही काही अभिमानास्पद बाब अजिबात नाही. कारण ज्या छत्रपतींच्या विचारांचे पाईक होण्याचा माझा प्रयत्न आहे त्यांनी स्वराज्याचा पाया 'गनिमीकाव्या'ने उभारला आहे, हे विसरून कसं चालेल!
गतवर्षी पासून अजून एक प्रवास नव्याने सुरू केला. यावेळी विचारांवर ठाम आणि प्रयत्नांवर विश्वास ठेऊन वाटचाल करायचं ठरवलं. त्या यज्ञात जे जे अर्पण करावं लागेल ते करायचं. २०१६ मध्ये सेफ झोन मी सोडून दिला होता. २०२० मध्ये नोकरी सोडून रिस्क झोन मध्ये दाखल झालो आणि आज हाय रिस्क झोन मध्ये आहे. असो, आज एवढं सगळं का सांगितलं? तर यामागील कारण एवढंच आहे, आज भले मी तुम्हाला भेट नसेन, मला तुम्हाला वेळ देता येत नसेल पण तरीही मी कोणाला विसरणार नाही, विसरू शकत नाही...
'सध्या तू करतोयस काय?' हा प्रश्न राहिलाच नाही का? सोपं आहे. 'पारतंत्र्यात राहूनही स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असणाऱ्या, हुशार भावास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा', अशा अशायाचा एक संदेश मिळाला आहे. हा संदेश हेच उत्तर आहे. सध्या मी 'पारतंत्र्यात राहून स्वातंत्र्याची आराधना करतोय'...
कळावे,
कायम आपलाच
कार्तिक जाधव
0 Comments